स्वतःला कसे ओळखावे?
मित्र हो,
आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयांवर बोलूयात.
विषय थोडा किचकट आहे पण कठीण नाही.तुम्ही शांतपणे तो प्रश्न व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचला तर अर्ध अधिक उत्तर सहजच मिळेल. पण त्यासाठी योग्य नियोजन, कष्ट करण्याची तयारी व मार्गदर्शन असेल तर आपणांस हा विषय समजायला सोप्प जाईल. आपण जर हे भाग्य मला दिले तर मी तुमचा Mentor व्हायला तयार आहे.
जास्त काही करायचंय नाही.शिकायला वयाची अट नाही. फक्त जिद्द, संयम आणि गुरूजणांवर ठेवलेली निष्ठा आणि शिकण्याची तळमळ असेल तर आपण हे दिव्य धनुष्य पेलू शकतो.
मित्र हो क गोष्ट लक्षात ठेवा.
आपण आज जरी पालक झालो असलो तरी एक काही वर्षांपूर्वी एक बालक होतो .आणि तो बालक मरेपर्यंत आपल्या साथीदार म्हणून शेवटपर्यंत कायम राहील हे मात्र विसरू नका.
जीवनाचा प्रवास हा बालक ते पालक ...पालक ते बालक ह्यातच चौकटीत बंदिस्त राहून फिरत असतो .त्यालाच आपण जीवनचक्र म्हणून संबोधतो. थोडक्यात काय बालपण ते तारुण्य..पण.नंतर म्हातारपण ते बालपण ..उतारवयात आपणास छोट्या मुलाप्रमाणेच जेवण भरवावे लागता..
आहे कि नाही खरी मज्जा.....
तर परत एकदा मुख्य विषयावर बोलूयात.स्वतःला कसे ओळखाल.म्हणूनच म्हणतो.आपण पालक म्हणून मुलांवर योग्य ते संस्कार करावयास हवे.मुलाना त्याच्या ध्येय साध्य करण्यासाठी मदत केली पाहिजेत. कारण मुले लहान आहेत त्यांना विचार करण्याची परिपक्वता आलेली नसते.तेव्हा आपण त्याना मार्ग दाखवला पाहिजेत.
कोणत्याही माणसाचे / किंवा स्वतःचे प्रामाणिक विश्लेषण करण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करावा.
१. निश्चित ध्येय - माणसाच्या आयुष्याला काही ध्येय असेल तर आणि तरच निश्चित दिशा असते. पाय मोकळे करायला कोणत्याही दिशेला गेले तरी चालते पण जर निश्चित स्थळी जायचे असेल तर निश्चित रस्ताच पकडावा लागतो. ध्येय कोणत्याही प्रकारचे असो … व्यावहारिक [पैसा, सत्ता नावलौकिक], प्रातिभासिक [कलेची साधना] किंवा आध्यात्मिक [आध्यात्मात विशिष्ट उंची प्राप्त करणे]. सर्वांनाच वाटते की आपण असामान्य आहोत पण जेव्हा आपण त्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांचे चरित्र वाचतो किंवा जाणून घेता तेव्हा इच्छा किंवा स्वप्न म्हणजे ध्येय नाही याची कल्पना येते.
२. वस्तूस्थितीचे भान - ध्येयाच्या प्राप्तीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या माझ्याकडे त्या प्रमाणात आहे का? म्हणजे व्यावहारिक ध्येय असेल तर जे व्यावहारिक ज्ञान, शैक्षणिक पात्रता, आणि बुद्धिचातुर्य असायला हवे ते आपल्याकडे आहे का? माणसे ओळखायची कला आपल्यात आहे का? स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल तर मुळात भांडवल उभारणी करणे शक्य आहे का? बाजारात आपली पत काय आहे? … अशा प्रश्नांची निश्चित उत्तरे हवीत.
प्रतिभासिक ध्येय असेल तर मुळात ती कला सिद्ध होण्यासाठी माझ्यात ती प्रतिभा आहे का? म्हणजे समजा एखादे तालवाद्य वाजवायला शिकायचे असेल तर ताल शिकता येतो पण लय ही अंगातच असावी लागते. आता ज्या माणसाला असंख्यवेळा ऐकलेली गणपतीची आरती म्हणताना टाळी नेमकी कुठे वाजवायची हे कळत नसेल तर तो मृदुंग, तबला, ढोलक … वगैरे तालवाद्य वाजवू शकणार नाही कारण त्याला मात्रा कळणार नाहीत तर 'सम' आणि 'खाली' कसे कळेल? किंवा मुळात ज्याचा हात स्थिर नसेल त्या माणसाला उत्तम दर्जाची चित्रकला जमणार नाही [मॉडर्न आर्ट ) तर सोडूनच द्या. जी व्यक्ती मुकी आहे किंवा तोतरी आहे तिला एक उत्तम गायक होणे कसे जमेल? एखाद्या खेळात विशेष प्राविण्य मिळवायचे असेल तर आपण हातीपायी धड आहोत का याची जाणीव पाहिजे. अपंग व्यक्तीने सामान्य लोकांच्यात मैदानी खेळ खेळण्याचे स्वप्न बघू नये. इतकेच मी येथे सांगू ईच्छूतो.
आध्यात्मिक ध्येय असणाऱ्या माणसांचा रस्ताच पूर्णतः वेगळा आहे आणि तो स्वतंत्र असा मोठा विषय आहे म्हणून इथे विस्तृतपणे लिहित नाही. पण एखाद्या संताचे चरित्र वाचल्यावर त्यांनी आयुष्यात जशी कठोर तपस्या केली आणि संसाराचा त्याग केला तसा आपल्याला जमेल का हे बघावे.फक्त इथे संत म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, श्रीधरस्वामी … वगैरे संत घ्यावेत. आधुनिक काळातील पंच तारांकित चॅनेलगुरु नव्हेत म्हणजे संत, महंत, महामंडलेश्वर, आचार्य, भगवान, ओशो, श्री., श्री. श्री., श्री.श्री.श्री., अनंतश्री, बापू, महाराज, बाबा, मामा, काका, तात्या, अम्मा, अक्का, काकी, मामी, मावशी, विद्यावाचस्पती, गुरु, महागुरू, जगत्गुरू, विश्वगुरु, ब्रह्मांडगुरु …. वगैरे नाहीत.
३. त्याग करण्याची तयारी - काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागणे अर्थात त्याग करायला लागणे शक्य आहे. पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित जसराज हे मुळचे तबलजी होते पण संतूरमध्ये कारकीर्द करण्यासाठी शिवकुमार शर्मा यांनी तबला सोडला तर शास्त्रीय गायनात कारकीर्द घडवण्यासाठी जसराज यांनी तबला सोडला. पंडित भीमसेन जोशी यांनी तर घरच सोडले होते. कोणत्याही ध्येयपूर्तीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो आणि कठोर परिश्रम करावेच लागतात. जर आपण आपली जगण्यावागण्याच्या पद्धतीत, सवयीत किंवा राहणीमानात तसूभरही बदल करण्यास तयार नसू तर आपल्याला नवीन जीवन पद्धती स्वीकारताच येणार नाही. म्हणजेच त्याग करण्याची मानसिक तयारी असावी. मुळात स्वभावात लवचिकता हवी.
४. अपयश स्वीकारायची तयारी - हे सर्व असूनही ध्येयपूर्ती होईलच असे नाही आणि ध्येयाची प्राप्ती झाल्यावर आनंद मिळेलच असेही नाही. कारण बरेच वेळा असे होते की उत्साहाच्या भरात आपण एखादे ध्येय धरतो … प्राप्तीसाठी तयारी करतो … आवश्यक तो त्याग करतो आणि जेव्हा ध्येयपूर्ती होते तेव्हा असे कळते की या शिखरावर पोहोचल्यावर जो अनुभव येईल असे आपल्याला पूर्वी वाटले होते तसे इथे काहीच नाही आणि त्यामुळे ध्येयपूर्ती होऊनही आनंद मिळत नाही. अशावेळी माणूस इतका खचतो की पूर्णतः वैफल्यग्रस्त होऊ शकतो आणि प्रसंगी आत्महत्यासुद्धा करू शकतो. त्यामुळे अपयश स्वीकारायची तयारी असलेली चांगली … क्रिकेट खेळणारा प्रत्येक मुलगा काही सचिन तेंडूलकर होऊ शकत नाही. मोठे आणि यशस्वी पैसेवाले सिनेकलावंत व्यसनाधीन का होतात आणि आत्महत्या का करतात.कारण त्यांचा भ्रमनिरास झालेला असतो किंवा त्यांना अपयश पचवता येत नाही.
हे निकष स्वतःला लागू करून बघावेत … प्रामाणिकपणे सखोल विचार करून जे उत्तर येते ते बरोबर असण्याची शक्यता आहे … कारण माणूस स्वतःशी खोटं बोलू शकत नाही.
लेखन कौशल्य-उदय माळगांवकर
लेबल: स्वतःला कसे ओळखावे?